श्रीलक्ष्मीपल्लीनाथाचा इतिहास
मौ जे पाली, ता. रत्नागिरी येथे असलेले लक्ष्मीपल्लीनाथाचे देवस्थान हेच आठल्ये घराण्याचे कुलदैवत होय. पाली या गावाचे पूर्वीचे नाव करंबेळे असे असून त्यावेळच्या ग्रामदैवतांच्या मूर्ती अरण्यात एकत्र ठेविलेल्या होत्या. अलीकडेच त्यांचे तेथे एक लहानसे देवालय बांधून त्यात त्यांची स्थापना करण्यात आली आहे. त्यास 'करंबेळदेव' असे म्हणतात. पल्लीनाथाच्या स्थापनेमुळे या गावाचे नाव पाली व देवाचे नाव पल्लीनाथ असे रूढ झाले आहे.
श्रीलक्ष्मीपल्लीनाथाची मूर्ती उभी असून तिचे ध्यान (वर्णन) पुढील श्लोकात वर्णिले आहे. हे तिन्ही श्लोक दररोज स्तोत्रपाठाबरोबर म्हणण्याचा प्रघात कित्येक वर्षे आठल्ये कुटुंबातून अद्यापि चालू आहे. ते स्तोत्र आहे -
जपाकुसुमसंकाशं रक्तनेत्रं त्रिलोचनम् ।।
दिगंबरं महाकायं भक्तानामभयप्रदम् ।।१ ।।
त्रिशूलं डमरू खड्गं पात्रं चे करपंकजे ।।
बिभ्राणं योगिनीनाथं पल्लीशं भूतनायकम् ।।२ ।।
युवानं हास्यवदनं तांबूलेना वृताननम् ।।
ऊर्ध्वकेशं भूतिभालं चिंतयेत् कार्यसिद्धिदम् ।।३ ।।
(अर्थ : ज्याचा वर्ण लाल असून डोळेही लाल आहेत, त्रिनेत्र, दिगंबर, भव्य आकार व भक्तांना अभय देणारा असा असून त्रिशूल, डमरू, खड्ग व पात्र ही ज्याने हातात धारण केली आहेत, योगिनीचा पती, पालीचा अधिपती, सर्व भूतांचा नायक असा हा असून जो तरुण, हसतमुख व ज्याच्या मुखात तांबूल आहे, ज्याचे केस उभारलेले असून कपाळास भस्म लाविलेले आहे, अशा या देवाचे चिंतन केल्याने सर्व कार्ये सफल होतात.)
या श्लोकात वर्णिल्याप्रमाणे पल्लीनाथ हा श्री शंकराचा अवतार असल्याचे उघड होते. कारण वरील सर्व आयुधे व भस्म ही शंकराकडूनच धारण केली जातात. श्री विष्णुमूर्तीच्या आयुधांत (शंख, चक्र, गदा आणि पद्मा) ती आढळायची नाहीत. पल्लीनाथाच्या नावापूर्वी लक्ष्मी असा शब्द लावण्यात येतो, यामुळे तिला विष्णुमूर्ती समजतात; पण तो समज बरोबर नाही. कारण वरील वर्णनाप्रमाणे तो निःसंशय शंकरस्वरूप आहे आणि यामुळेच याची पूजा लिंगायत गुरवाकडून केली जात आहे. या मूर्तीवर रुट्रैकादशिनीनेच अभिषेक करण्याची प्रथा प्राचीन कालापासून चालू आहे. लक्ष्मी ही योगिनी (सहायक) असून पुरुषस्वरूपी शिवाबरोबर स्त्रीस्वरूपी शक्ती असणे जरूरच आहे. शिव आणि शक्ती हेच सर्व जगताचे मूलस्वरूप असल्याने सर्वत्र तशी योजना केली असल्याचे दिसून येते.
कोल्हापूरनजीक 'रत्नागिरी' या नावाचा डोंगर ७-८ मैलांवर उत्तरेस आहे. या डोंगरावर श्रीलक्ष्मी रवळनाथ (जोतिबा) या नावाचे देवस्थान असून त्या मूर्तीचे सर्व स्वरूप व वर्णन श्री लक्ष्मीपल्लीनाथाप्रमाणेच आहे. करवीरच्या लक्ष्मीची दांडी दरसाल जोतिबाकडे जाते. या रवळनाथास उत्तर केदार व पल्लीनाथास दक्षिण केदार असे म्हणतात. ही दोन्ही देवालये दक्षिणाभिमुख आहेत. या दोन्ही ठिकाणी दरसाल वार्षिक उत्सव चैत्र महिन्यात शुद्ध दशमी ते पौर्णिमपर्यंत होतो. चैत्र पौर्णिमा हा दिवस आपल्या कुलदैवताच्या जन्मदिवसाप्रमाणे समजून त्या दिवशी त्याचे आश्रित, भक्त व उपासक पूजा, अभिषेक व ब्राह्मणभोजनादि करून आराधना करीत असतात. आठल्ये यांच्या कुलस्वामीचा (कुलधर्म) दिवस चैत्र शुद्ध १५ हाच पाळला जातो. त्यामुळे पूर्वपरंपरा कायम राखणे व कुलस्वामीच्या ठिकाणी असलेली कृतज्ञताबुद्धी कायम ठेवणे ही फार महत्त्वाची कार्ये घडून जातात.
कोकणात जी घराणी करहाटक (क-हाड) प्रांतातून प्रथम गेली, त्या सर्वांचे कुलदैवत पल्लीनाथ आहे. आठल्ये, टिकेकर, खांडेकर, चांदोरकर, तांबे, नेवाळकर वगैरेंचा कुलस्वामी पल्लीनाथ आहे, तर पंडित, जमेनीस, सरदेशपांड्ये, सरपोतदार, कारखानीस वगैरे घराण्यांचा कुलस्वामी रवळनाथ आहे. असा हा फरक का असावा, याचा विचार केला तर असे दिसून येते की अकराव्या-बाराव्या शतकांत जी घराणी रत्नागिरी जिल्ह्यात येऊन स्थिर झाली, त्यांना आपल्या पूर्वीच्या कुलस्वामीची (रवळनाथाची) उपासना करण्यास त्या काळच्या प्रवासाच्या बिकट परिस्थितीमुळे अडचण उपस्थित झाली असेल व त्यामुळे त्याचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी त्याचेच नाव बदलून पाली येथे त्याची स्थापना केली असेल; पण त्यानंतर जे चौदाव्या-पंधराव्या शतकात किंवा त्यानंतर कोकणात आले, त्यांनी आपला रवळनाथ हाच कुलस्वामी कायम ठेवला आहे. याच सुमारास भाटवडेकर, तळवलकर इत्यादी घराणी या जिल्ह्यात आली, त्यांचा कुलस्वामी जेजुरी येथील मल्हारी (खंडोबा) हा आहे. यावरून वरील अनुमानास बळकटी येत आहे, हे उघड आहे.
श्री लक्ष्मीपल्लीनाथ या देवस्थानास स्थावर इनाम जमिनीचे वगैरे उत्पन्न नाही. पाली हा गाव खोती आहे व खोत परधर्मी आहे. या गावच्या ग्रामदेवतेचे पुजारी व पल्लीनाथाचे पुजारी लिंगायत गुरव हे एकच आहेत. ग्रामदेवतेचे देऊळ पल्लीनाथाच्या पोवळीच्या आतच बांधलेले आहे.
झाशी संस्थानचे अधिपती श्री. नेवाळकर यांचा कुलस्वामी पल्लीनाथ हाच असल्यामुळे या देवाची पूजा आपल्याकडून नित्य दररोज व्हावी, या इच्छेने त्यांनी ब्राह्मणद्वारा ती आपले उपाध्ये हळबे, रा. निवसर यांच्या नावे करण्यासाठी दरसालची नक्त नेमणूक रुपये नव्वदची केली आहे व ती आजपर्यंत इंग्रज सरकारकडूनही चालविली जात आहे. या श्री पल्लीनाथ मूर्तीच्या मस्तकावर धारण करण्यासाठी सुवर्णाचा मुकुट सातारा येथील श्री. आगटे यांनी अर्पण केला आहे, तो उत्सवात दरसाल श्रींच्या
डोक्यावर महापूजेच्या दिवशी घालतात. तो सुमारे एक शेर वजनाचा आहे. इतरही रुप्याचे मुखवटे आहेत. हरचिरी येथील इंदूर संस्थानातील मुळ्ये ताजीमसाहेब यांजकडून उत्सवाच्या मदतीकरिता दरसाल रु. १५ नियमितपणे येतात.
या देवस्थानचा उत्सव दरसाल वर्गणीने केला जात असे; पण शके १८३८ साली या देवाच्या ६०-७० गावच्या भक्तमंडळींनी 'श्री लक्ष्मीपल्लीनाथ व्यवस्थापक मंडळी' या नावाची संस्था स्थापन केली व त्या संस्थेने वेळोवेळी द्रव्यनिधी जमा करून उत्सव फंड, इमारती दुरुस्ती फंड वगैरे निर्माण करून, त्याच्या व्याजातून उत्सव करण्याची व्यवस्था केली आहे. (संस्था स्थापन झाल्यापासून किमान तीस वर्षे वि. वा. आठल्ये (इनामदार, शिपोशी) संस्थेचे अध्यक्ष होते.) श्रींचा प्रासाद, दोन धर्मशाळा, नगारखाना, देवस्थानाकरिता बांधलेली भरपूर पाण्याची तळी, देवालयापासून तळीपर्यंतची दगडी पाखाडी इत्यादिकांच्या दुरुस्त्या जरुरीप्रमाणे वेळोवेळी करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी-कोल्हापूर रस्त्याच्या पंधराव्या मैलापासून देवालयापर्यंत सुमारे १ मैल लांबीचा रस्ता लोकल बोर्डाकडून तयार करण्यात आला असून हल्ली त्या रस्त्याने देवस्थानच्या पोवळीपर्यंत मोटार जाते. त्याचप्रमाणे सदर बोर्डाकडे मागणी करून देवालयाशेजारी विहीर पाडून घेण्यात आली आहे.
देवाच्या प्रासादापासून पोवळीपर्यंत चारही बाजूंना दगडी पापडी, पोवळी व नगारखाना ही माजी राज्यांतील अधिपतींनी बांधविली असे समजते. या देवाचा हा उत्सव वे. शा. सं. गजाननबुवा हळबे यांनी १०० वर्षांपूर्वी या प्रांतातील त्यांच्या सर्व भक्तमंडळींकडून देणग्या मिळवून सुरू केला. परंतु ते निवर्तल्यावर उत्सवास उत्पन्न येणे बंद झाल्यामुळे तो डबघाईस आला आणि म्हणून 'श्री लक्ष्मीपल्लीनाथ व्यवस्थापक मंडळी' स्थापन करण्यात आली..
आठल्ये यांचा कुलस्वामी लक्ष्मीपल्लीनाथ व आराध्य भवानी खड्गेश्वर हा आहे. कित्येकांकडून प्रश्न विचारण्यात येतो की, या दोहोंत फरक का व तो कशामुळे उत्पन्न झाला आहे? त्याचे उत्तर असे की, कित्येक कुलांचे संरक्षण ज्या ईश्वर अवतारी व पराक्रमी पुरुषाने महाआपद्ग्रस्त स्थितीत केले, त्या सर्व घराण्यांनी त्यास आपला कुलस्वामी मानले आणि एका घराण्याच्या मूळ पुरुषाने आपल्या आवडीप्रमाणे आराधना करण्यासाठी जो देव निवडला, तो त्याचा आराध्य देव म्हणून मानला गेला, हे सयुक्तिकच होय आणि यामुळेच आराध्य म्हणजे उपासनेसाठी स्वीकारलेला देव व कुलस्वामी म्हणजे एका प्रांतातील अनेक कुटुंबांचे ज्याच्याकडून संरक्षण केले गेले, तो त्यांचा कुलस्वामी अशा संज्ञा रूढ झाल्या आहेत.